श्री अरविंदाची शिकवण
यूट्यूबवर पाहा (YouTube): https://youtu.be/cXtCazKPMT0
श्रीअरविंद यांची शिकवण भारतातील प्राचीन ऋषींच्या शिवणुकीपासून सूरू होते – की विश्वाच्या बाह्य स्वरूपामागे अस्तित्व आणि चेतनेचे एक असे ‘सत्य’ आहे जे विश्वातील सर्वच गोष्टींचे एकमेव आणि शाश्वत आत्म-स्वरूप आहे. सर्वच जीव त्या एकमेव आत्म्याशी एकरूप झाले आहेत, पण चेतनेतील काही विभाजनामुळे ते विभक्त वाटतात, हे विभाजन म्हणजेच खरे ‘आत्मतत्व’ व ‘सत्य’ ह्याबद्दलचे त्या जीवांच्या मनात, जीवनात आणि शरीरात रूजलेले ‘अज्ञान’ होय. एका विशिष्ट मानसशास्त्रीय शिस्तीने या विभाजीत चेतनेच्या पडद्याला दूर करता येते आणि त्याद्वारे खऱ्या आत्म्याची, आपल्या नि सर्वांमध्ये असलेल्या ‘दिव्यत्वा’ची जाणीव आपणास होऊ, शकते.
श्रीअरविंद म्हणतात की हे ‘एक’च आत्मतत्व आणि चेतना येथे भौतिक वस्तुंमध्ये अंतर्भूत आहे. उत्क्रांती ही त्यांच्या मुक्ततेची प्रक्रिया आहे; जे अचेतन आहे असे वाटते तिथे चेतना उदयास येते, आणि एकदा प्रकट झाल्यावर ती स्वयंप्रेरणेने अधिकाधिक वर जाते व त्याच वेळी स्वत:ला अधिकाधिक व्यापक करून महानतम् परिपूर्णतेकडे वाटचाल करते. ‘जीवन’ चेतनेच्या मुक्ततेची पहिली पायरी आहे; ‘मन’ ही दुसरी; परंतु उत्क्रांती मनाच्या पातळीवरच संपत नाही, तीला आणखी उच्च चेतनेच्या अवस्थेची प्रतीक्षा असते, एक अशी चेतना जी सर्वस्वी आध्यात्मिक आणि अतिमानसिक (Supramental) असेल. उत्क्रांतीची पुढची पायरी म्हणजे सुपरमाईंड (Supermind) आणि आत्मा ह्यांचा एक प्रमुख शक्ती म्हणून चेतनायुक्त जीवामध्ये विकास. कारण तेव्हाच वस्तुमात्रात अंतर्भूत असलेली ‘दिव्यता’ स्वत:ला संपूर्णपणे मुक्त करू शकेल आणि जीवनास परिपूर्णता प्रकट करणे शक्य होईल.
परंतु जेव्हा की उत्क्रांतीच्या पहिल्या पायऱ्या प्रकृतिने वनस्पती आणि प्राणी जीवनात सचेतन संकल्पा-शिवाय घेतल्या होत्या, मात्र मनुष्यामध्ये प्रकृति त्याच्या जाणीवपूर्वक संकल्पशक्तिद्वारा उत्क्रांत होऊ शकते. तथापि हे केवळ मनुष्याच्या मानसिक संकल्पाच्याबळावर पूर्णपणे साध्य होऊ शकत नाही, कारण मन फक्त एका विशिष्ट बिंदूपर्यंतच जाते आणि त्यानंतर एका वर्तुळात फिरत राहते. एक आमूलाग्र परिवर्तन आवश्यक आहे, चेतनेचे एक वळण ज्यायोगे मन एका उच्चतर तत्वात रूपांतरित होईल. ही पद्धत प्राचीन मानसशास्त्रीय शिस्त आणि योगाभ्यासातून सापडते. पूर्वी हे जगापासून फारकत घेवून आत्मा किंवा आत्म्याच्या उंचीमध्ये विलीन होऊन करण्याचे प्रयत्न केल्या गेले. श्रीअरविंदांचे प्रतिपादन असे की एका उच्चतर तत्वाचे अवतरण शक्य आहे जे केवळ आध्यात्मिक पुरूषाला जगातून मुक्त करणार नाही तर जगामध्येच मुक्त करेल, मनाच्या अज्ञानाला किंवा त्याच्या अत्यंत मर्यादित ज्ञानाला अतिमानसिक (Supramental) सत्-चेतनेने बदलून जे अंत:स्थ आत्म्याचे समर्पक साधन बनेल आणि मनुष्याला स्वत:ला अंतर्गत आणि क्रियाशील स्वरूपात शोधणे शक्य करेल आणि त्याच्या अजूनही प्राणी स्वरूपातील मानवतेतून अधिक दिव्य जातीकडे उत्क्रांत होण्यास सक्षम करेल. योगाची मानसशास्त्रीय शिस्त या उद्देशपुर्तीकरिता वापरता येते ज्याद्वारे आपल्या अस्तित्वाच्या सर्व भागांना परिवर्तनासाठी किंवा रूपांतरणासाठी उघडता येते आणि अजूनही गुप्त किंवा लपून असलेले अतिमानसिक तत्व (Supramental Principle) अवतरून कार्य करू शकते.
तथापि हे लगेच किंवा थोड्या वेळात किंवा एखाद्या जलद वा चमत्कारिक परिवर्तनाने होणार नाही. अतिमानसिक अवतरण शक्य होण्याआधी साधकाला अनेक पायऱ्या पार करणे गरजेचे आहे. मनुष्य बहुतेक वेळा त्याच्या पृष्ठभागावरील मन, जीवन आणि शरीरात राहतो पण त्याच्या आत एक अंतर्गत अस्तित्व आहे ज्यात अधिक महान शक्यता आहेत ज्याला त्याने जागृत करणे आवश्यक आहे – कारण सध्या तो त्यातून फारच मर्यादित प्रभाव ग्रहण करतो आणि तो त्याला अधिक सौंदर्य, सामंजस्य, शक्ती आणि ज्ञानाच्या शोधार्थ पुढे सारत असतो. म्हणून योगाची पहिली प्रक्रिया म्हणजे या अंतर्गत अस्तित्वाच्या क्षेत्रांना उघडणे आणि तिथून बाहेर जगणे, त्याचे बाह्य जीवन एका अंतर्गत प्रकाश आणि शक्तीने नियंत्रीत करणे. असे करताना तो स्वत:मध्येच त्याचा खरा आत्मा शोधून काढतो जो ह्या बाह्य मानसिक, प्राणिक आणि भौतिक घटकांचे मिश्रण नाही तर त्यामागील सत्याचा एक अंश आहे, एका दिव्य अग्नीपासून आलेली एक ठिणगी. त्याने स्वत:च्या आत्म्यात जगायला शिकले पाहिजे आणि त्याच्या प्रेरणेने त्याच्या इतर स्वभावधर्माला शुद्ध करून सत्याच्या दिशेने वळवले पाहिजे. त्यानंतर वरील एक मार्ग उघडतो व त्यातून अस्तित्वाच्या उच्चतर तत्वाचे खाली अवतरण शक्य होते. पण तरीही ते लगेच अतिमानसिक प्रकाश आणि शक्ती नसते. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक सत्-चेतना ह्यांच्यामध्ये चेतनेचे कित्येक स्तर आहेत. हे मघले स्तर उघडणे आणि त्यांची शक्ती मन, जीवन आणि शरीरात आणणे अत्यंत निकडीचे आहे. तद्नंतरच सत्-चेतनेची पूर्ण शक्ती स्वभावात कार्य कर शकते. म्हणूनच आत्म-शिस्त किंवा साधनेची प्रक्रिया दीर्घ आणि अवघड आहे, परंतु तिचा अत्यंत थोडा भागही प्रचंड लाभदायक असतो कारण त्याने अंतिम मुक्तता आणि परिपूर्णता अधिक सुकर होते.
जुन्या प्रणालींमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या मार्गावर चालण्याकरिता आवश्यक आहेत – मनाला अधिक व्यापकतेप्रति आणि आत्मा व अनंततेच्या जाणीवेप्रति खुले करणे, ज्याला ब्रह्म चेतना म्हणतात तिथे उद्गमन करणे, इच्छा आणि वासनांवर प्रभुत्व मिळवणे; बाह्य वैराग्य आवश्यक नाही, पण इच्छा आणि आसक्तीवर विजय तसेच शरीर व त्याच्या गरजा, लोभ आणि प्रवृत्ती यांच्यावर नियंत्रण अनिवार्य आहे. जुन्या प्रणालींची एक एकजूट आहे: सत्य आणि रूप यामघील विवेकाने ज्ञानाचा मार्ग, हृदयाचा भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा मार्ग तसेच कर्माचा मार्ग जो संकल्पाला स्वार्थाच्या प्रेरणांपासून दूर करून सत्य आणि अहंकारापेक्षा मोठ्या सत्याच्या सेवेकडे वळवतो. कारण संपूर्ण अस्तित्वालाच प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, जेणेकरून ते प्रतिसाद देऊ शकेल आणि रूपांतरित होऊ शकेल जेव्हा तो मोठा प्रकाश आणि ती शक्ती स्वभावात कार्य करण्यास सक्षम होईल.
या शिस्तीत, गुरूंची प्रेरणा, आणि कठीण प्रसंगी त्यांचे नियंत्रण व उपस्थिती अनिवार्य आहे – कारण अन्यथा अनेक अडथळे व चुकांशिवाय ह्या मार्गावर चालणे अशक्य आहे ज्यामुळे यशाच्या सर्व संधींना आळा बसेल. गुरू तो असतो जो उच्चतर चेतना आणि अस्तित्वापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्याला अनेकदा त्याचे अवतार किंवा प्रतिनिधी मानले जाते. तो केवळ त्याच्या शिकवणीनेच नव्हे तर त्याच्या प्रभाव आणि उदाहरणाने तसेच त्याचा स्वत:चा अनुभव इतरांना पोहोचविण्याच्या शक्तीनेही मदत करतो.
हीच आहे श्रीअरविंद यांची शिकवण आणि साधनेची पद्धत. त्यांचा हेतू कोणताही धर्म विकसित करणे, जुने धर्म एकत्रीत करणे किंवा एकादा नवीन धर्म स्थापन करणे नाही, कारण ह्यातील कुठलीही गोष्ट त्यांच्या मुख्य उद्दिष्टांपासून परावृत्त करतात. त्यांच्या योगाचे एकमेव प्रयोजन म्हणजे आंतरिक आत्म-विकास ज्याद्वारे प्रत्येक साधक कालांतराने सर्वांमध्ये एकच ‘आत्मा’ शोधू शकतो आणि मानसिक चेतनेपेक्षा अधिक उच्च चेतना-आध्यात्मिक आणि अतिमानसिक चेतना (Supramental consciousness) — विकसित कर शकतो, जी मानवी स्वभावाला रूपांतरित करून त्याला दिव्यत्व प्रदान करेल.
~ श्री अरविंद
शिष्याला पत्र, फेब्रुवारी १९३४
CWSA खंड ३६, आत्मचरित्रात्मक टिपा, पृष्ठ: ५४७–५५०
अनुवाद: हरेंद्रकुमार रामटेके, श्रीअरविंद आश्रम
यूट्यूबवर पाहा (YouTube): https://youtu.be/cXtCazKPMT0